Monday, December 29, 2014

मला काहीच कसे स्मरत नाही!

आठवतो का तुला,
तो अर्ध-उध्वस्त कट्टा,
तो फेसाळणारा सोडा,
तो मोरपंखढापलेला,
तो सुगंधी एकांततुझ्यापासून चोरलेला!
मला काहीच कसे स्मरत नाही!

आठवते का तुला,
ते बेधुंद वारे,
ते मनसोक्त फिरणे,
ती मौनातली भांडणे,
ते लडिवाळ स्पर्शकधी नकळत तर कधी मुद्दामलेले!
मला काहीच कसे स्मरत नाही!

शब्दांमधून उमलणारी तू आज 
जुन्या कवितांतूनही  भेटत नाहि,
मोरपिसांतून झळाळणारी तू आज 
कृष्ण-सावळ्या मेघांतूही पाझरत नाहि!
मनगाभा-यात दरवळणारी तू आज
मनाच्या जळमटातही का सापडत नाहि!
मला काहीच कसे स्मरत नाही!

हिमांशु डबीर


Wednesday, October 1, 2014

आव्हान

फुटलो तरी शकलातून आहे उरलो,
आयुष्याला देत आव्हान..
"चाल तुझी चाल" म्हणालो!

हिमांशु डबीर

Thursday, September 25, 2014

संवाद विरोधी


संवाद विरोधी
आयुष्य आले सामोरी
म्हणे चल खेळ खेळू मिळूनी
हसलो, म्हणलो त्यासी
देह माझा, गती तुझी!
भोग माझा, पुण्याई तुझी!
जायचेच ना सर्वांना इथूनि
तरी मी अता "श्री गणेशा" करी!
धर्मा पातला दारी,
म्हणे "पाशातून तुला मुक्त करी"
बोलालो तुझा संवाद विरोधी,
श्वास माझा, उधारी तुझी,
मोह माझा, माया तुझी,
द्यावया मुक्ती तरी
का "पाश"च तु योजिशी!
देव आला संमुखी
म्हणे बोल काय देऊ तुसी
नमिता झालो बोलून सत्त्वरी
" त्र्यंबकं यजामहे 
सुगंधिम् पुष्टिवर्धनम्! …”
 
 
हिमांशु डबीर
२५-सप्टेंबर-२०१४ 

Monday, September 22, 2014

कोण म्हणते…


कोण म्हणते

 

कोण म्हणते, गेलात तुम्ही?

वाडीच्या घाटांवर आजही, "बोट" माझे कोण धरतो आहे!

 

कोण म्हणते, गेलात तुम्ही?

अंबेच्या मंदिरातून आजही, "सांग गणेशाला" कोण मला सांगतो आहे!

 

कोण म्हणते, गेलात तुम्ही?

समुद्रकिनारी आजही, शिळ "वाऱ्याची" कोण मला शिकवीत आहे!

 

कोण म्हणते, गेलात तुम्ही?

गड-किल्ल्यांना बिलगून आजही, इतिहास कोण मला "ऐकवित" आहे!

 

कोण म्हणते, गेलात तुम्ही?

कृष्णेच्या लाटांवर आजही, "ॐ" ध्वनी निनादतो आहे!

 

कोण म्हणते, गेलात तुम्ही?

औदुंबराशी आजही, "सप्ताह" कुणाचा घडतो आहे!

 

कोण म्हणते, गेलात तुम्ही?

"तुळापुर" संगमात डोकावता मी आजही, "प्रतिबिंब" तुमचे दिसते आहे!

 

हिमांशु डबीर

२२-सप्टेंबर-२०१४

Wednesday, September 10, 2014

लहान लहान

लहान लहान

छोटे छोटे हात पसरता,
पायाभोवती वेढा घालता,
अडखळे मन हळवे होता,
नेत्री दाटे प्रेम-झरा!

बोल-बोबडे अर्थ लावता,
सुरावटींची नक्षी फुलता,
स्फुरत जाते नवीच भाषा,
हृदयी उमले आनंद-मळा!

निरागस डोळे भाव-विभोरता,
विलसे हास्य केवळ बघता,
छोटुश्या मिठीचा अवीट विळखा,
गळून पडे अभिमान-फुकाचा!

खाणा-खुणांचा खेळ खेळता,
अगम्य भाषा अथक बोलता,
नेत्र लाकाकीती साद घालता,
उलगडत जाई पदर नात्याचा!

धावत येउन निरागस बिलगता,
अत्योल्हासाने अफाट खिदळता,
विसरून जावी अवघी व्यथा,
अर्थ उमगे नव्या जिण्याचा!

हिमांशु डबीर
२८-जुलै-२०१४

हि कविता फेसबुकवर वाचनात आलेल्या एका कवितेवर आधारित आहे! कवीचे नाव आठवत नाही! पण त्यानेही लहान मुलांच्या भाव-विश्वाचे फार सुरेख वर्णन केले होते त्याच्या कवितेते.. त्या कवितेने मला माझ्या भाच्चीला पाहून तिच्यावर हि कविता करायला प्रवृत्त केले! त्या कवीचे मी मनापासून आभार मानतो!

वर्तमानात भूतकाळ जागविणारा तो क्षण


वर्तमानात भूतकाळ जागविणारा तो क्षण


त्या दिवशी खरतर त्यांना भेटायला जाताना मनात खूप भाव दाटून आले होते, जावे का नाही हेही कळत नव्हते! पण त्यांचे वय आणि आपले नाते-संबंध पाहता जाणे प्रशस्त दिसले नसते आणि शिवाय या दोघी छोट्या, त्यांनाहि "पणजी" पाहायला मिळेल आणि पणजी लाही यांना पाहता येईल म्हणून मनाचा हिय्या करून अखेर जायचे ठरले! खरंतर या छोट्या दोघींना काही कळत नाही, त्यामुळे पणजी म्हणजे काय हेही त्या बिचाऱ्यांना काय समजणार! पण निदान पणजी तरी यांना पाहिलं यासाठी म्हणून आम्ही म्हणजे मी, आई, मेधा आणि दोघी छोट्या निघालो!

उर भरून येतो तेव्हा विचार एकाच असतो कि "त्यावेळी" जे आपण पहिले निदान ते "तसेच्या तसे" सामोरे येवो! पण आपल्याला जे हवे असते ते नियतीला मंजूर असेलच असे नाही!

दुपारी चार वाजता आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये पोचलो. वाटले होते कि काही जुने दिसणार नाही, अर्थात ते आठवल्याशिवाय राहणार नव्हते हे जरी खरे असले तरीही! गेट मधून आत पाउल टाकले आणि समोरच "ती" उभी असेलेली दिसली! त्याच ठिकाणी, आणि अगदी तशीच जशी ती "त्यावेळी" होती! पाउल अडखळले! पाणी उभे राहिले डोळ्यात, पण दिसू द्यायचे नाही म्हणून "तिच्याकडे" तिरक्या नजरेने पाहत पुढे गेलो. आई तर "तिला" पाहून पार खचली होती! आईचा अस्फुट हुंदका मी ऐकला, पण काय करू.. तीच अवस्था माझीही होती! स्वतःला तसेच पुढे फरफटत नेले, पण "त्या" आठवणी आमच्या आधीच तिथे उभ्या ठाकल्या होत्या!

मेधाचे सासरे भेटले, पण मान वळवून मी आणि आई "तिच्या"कडेच पाहत होतो! तेवढ्यात तिथे एकाला घेऊन तिथले कर्मचारी "तिच्या" पाशी आले! काय दैव असते, आलेल्या आठवांचा एक तडाखा आम्ही कसाबसा परतवत होतो, तोच दुसरी लाट आमच्यावर आदळली! काय करू, कसे सावरू, मग जान्हवी आणि अनुष्का यांच्यात लक्ष गुंतवले!

तोवर तिथल्या कर्मचार्यांनी त्यांची कार्ये करून "तिला" पाठवून दिले होते!

आई "ती" रूम शोधत होती, आणि पाय जणू दगड झाल्याप्रमाणे थिजली होती… तिथेच! मेधाच्या सासऱ्यांच्या मागे मागे आम्ही पहिल्या मजल्यावर गेलो, आजींचे ओपरेशन झाले होते, पण त्या रिकव्हरी रूम मध्ये होत्या.. वेळ जाता जात नव्हता आणि बाबा, आम्ही  मात्र प्रत्येक क्षणाला भूतकाळात ओढले जात होतो!

अवघड असते हो हे सगळे! कोण म्हणते कि वर्तमानात भूतकाळ जगता येत नाही!

त्या दिवशी आई आणि मी "त्याच" संजीवनी हॉस्पिटल मध्ये "तिला" अर्थात त्याच अम्बुलन्सला पाहून भूतकाळ वर्तमानात जगत होतो! आणि बाबा अजून कडी म्हणजे आजींचे ओपेरेशन करणारा डॉक्टर सुद्धा तोच होतोहो!

वर्तमानात भूतकाळ जागविणारा तो क्षण, त्यानंतरही आम्हाला वर्तमानात येऊ देण्यासाठी शर्थ करत होता, पण समोरच्या दिसत असलेल्या जबाबदाऱ्या आणि नाविन्याची चाहूल यांनी त्या भूतकाळाला थोडेसे थोपवून ठेवेले आहे.. तूर्तास तरी!


हिमांशु डबीर
18-Aug-2014