Monday, August 19, 2013

थरार... थरार...


थरार... थरार...

प्रसंग... प्रसंग...
कोसळ...कोसळ...
आभाळ...आभाळ...
भयच...भयच...
मनातून!

मार्गस्थ...मार्गस्थ...
भटके...भटके...
सुटले...सुटले...
आयुष्य...आयुष्य...
हातातून!

कोण...कोण...
कुठे...कुठे...
वादळ..वादळ..
दिशाहीन...दिशाहीन...
हृदयातून!

साद...साद...
आलीच...आलीच...
कर्कश...कर्कश...
सांजवेळ...सांजवेळ...
कर्णातून!

जगणं...जगणं...
मरणं...मरणं...
यातना...यातना...
भळाळ...भळाळ...
व्रणातून!

सावर...सावर...
आवेग...आवेग...
पाझर...पाझर...
थेंबच...थेंबच...
नेत्रातून!

हिमांशु डबीर

19-08-2013

Wednesday, August 14, 2013

शांत डोह... डहुळ...डहुळ...!

बाबा गेल्यानंतर आईची मनस्थिती शब्दबद्ध करायचा हा एक प्रयत्न..

शांत डोह... डहुळ...डहुळ...!

नयनातून पाझर...
काळजातून घोर...
कानातून साद...
हृदयातून तरंग...
तरी हा शांत डोह... डहुळ...डहुळ...!


नाना प्रसंग...
कंपित काळीज...
चर्या निर्धार...
अवघाच कोलाहल... तरी हा...
शांत डोह... डहुळ...डहुळ...!


नियतीची भूल...
जीव घालमेल...
सावर सावर... आभाळ... आभाळ ...
विस्कळीत अवघे... तरी हा....
शांत डोह... डहुळ...डहुळ...!

हिमांशु डबीर
14-8-2013

Monday, July 15, 2013

महायात्रामहायात्रा!
लय श्वासांची बिघडली... 
सय प्रभूंची दाटली!
"मैया" बोलावू आली... 

 इहलोकीची यात्रा थांबली!


नामस्मरण सखा सोबती...  
पंचप्राण हिच आरती!
"पालखी" अताशा विसावली... इहलोकीची यात्रा थांबली!
ब्रम्हानंदी टाळी लागली... 
हाक आप्तांची विरली
महायात्रा "कैसी" सजली... 
इहलोकीची यात्रा थांबली!


कुठले पाश, माया कुठली... 
भावबंधने "अपघाते" तुटली!  
असाल सदा अमुच्या सोबती...तरी "हि" इहलोकीची यात्रा थांबली!
अखेर "ती" साद आली...  
प्रतिसादे हि कुडी अर्पिली
येतोय गे "मैया" तव कुशी...  
इहलोकीची यात्रा थांबली!


आला टप्पा... श्वासमाळ खुंटली...
"ओंकार" ध्वनी पंचत्वे घुमली!
"यशवंत" पाऊले "मुग्ध" झाली...
इहलोकीची यात्रा थांबली!
हिमांशु यशवंत डबीर
२०
-जून-२०१३


माझे वडिल श्री. यशवंत हरी डबीर यांना २०-जून-२०१३ रोजी देवज्ञा झाली! माझ्या वडिलांच्या अखेरच्या दोन दिवसांत जो माझा अन् त्यांचा संवाद झाला तो शब्दबद्ध करायचा हा एक यत्न!


Wednesday, December 12, 2012

आंबा आणि आजोबा भाग - २

आठवणींच्या हिंदोळ्यात आजोबा अलवारपणे झोपी गेले होते...

पुढे चालू...

गण्याने पाहिले कि आजोबा झोपले आहेत, अगदी निरागस बालकासारखे! त्याला आजोबांना जागे करायची इच्छा होत नव्हती, पण पाने खोळंबली होती! त्याने आजोबांना हाक मारून जागे केले. आजोबाही जेवायला आले! केळीच्या पानावरचा तो वाफाळलेला भात त्यावर मुगाचे वरण आणि साजूक तुपाची धार! प्रसन्न वातावरणात आजोबांचे जेवण सुरू झाले! तांदळाची भाकरी, गरमागरम कुळीथाचे पिठले! 'क्या बात है!' आजोबा नकळत दाद देऊन गेले! उकडीचे मोदक, बिरड्याची उसळ असा तो आवडीचा बेत खाऊन आजोबांचा आत्माराम शांत झाला! रोज टेबल-खुर्ची वर बसून मोजकेच जेवणारे आजोबा आज तृप्त झाले! घरच्या लक्ष्मीला मनोमन वंदून आजोबा उठले. गण्याने वाडीतील ओली सुपारी दिली. पाय मोकळे करण्यासाठी आजोबा वाडीत गेले. छोटीशीच वाडी ती, पण केळी, सुपारी, आंबा, जायफळ, नागवेलींनी हिरवीगार दिसत होती. सुपारी चघळत चघळत आजोबा आंब्याच्या सावलीत बसले. त्या गर्द आमराईत माथ्यावर आलेल सुर्य सुद्धा शितल भासत होता.

आंब्याचा मोहोर टपकन आजोबांच्या अंगावर पडला तसे आजोबांनी वर पाहिले आणि त्यांना भासले कि जणू तेच मोहोरले आहेत!

त्यांच्याच नकळत त्यांचा त्या आंब्याशी संवाद सुरू झाला -

'काय आजोबा कसे आहात? बरे वाटते आहे ना!' त्या प्रश्नांनी आजोबांना जिवलग भेटल्याचे वाटले. त्यांचा श्वास भरून आला, हसून त्यांनी झाडाकडे पाहिले!

'बघा आजोबा, मला आता छान मोहोर लागायला सुरूवात झाली आहे! थंडी वाढली की मोहोर वाढतच जाणार आणि मी देखील बहरत जाणार! पक्ष्यांची किलबिल वाढणार अन् वा-यावर डुलणा-या कै-यांचा भार पेलण्यात मी दंगून जाणार! मजाच मजा असते आजोबा!'

आजोबा बोलले - 'खरं आहे बाबा तुझं, भाग्यवान आहेस! दरवर्षी मोहोरतोस! आंब्याने लगडतोस, पन्हे देऊन शांत करतोस, रसाने तृप्त करतोस अन् जीभेवर रेंगाळणारी लोणच्याची चव देतोस! फळांच्या राजाचा राजवाडाच तू!

आजोबा थोडे स्तब्ध झाले, मनात शोधू लागले की आपण कधी असे मोहोरलो होतो? आंब्याला ते म्हणाले, 'अरे तुला माहित नसेल पण मला अगदी स्पष्ट आठवते... मी देखिल आयुष्यभर असाच बहरत होतो.. आईच्या उदरात वाढत होतो, संस्काराने वृध्दिंगत होतो, सवंगड्यांबरोबर बागडत होतो, भांडत होतो, करियरची वाट शोधत होतो. यशापयशाची गोडी चाखत होतो. आई-वडिलांच्या भक्कम आधारावर नोकरी व्यवसायात स्थिर होत होतो.

बघता बघता लग्नाच्या बेडीत धुंद होत होतो! इटुकल्या सोनपावलांनी आलेल्या पिल्लांचा पसारा वाढवत होतो, त्यांच्या वाढीत बहरत होतो. सुख-दु:खाच्या क्षणांत मोहरत होतो. वा-याशी स्पर्धा करताना जीवनसाथीच्या बरोबरीने धावत होतो. क्षणाची उसंत न घेता हर क्षण साथ देणारी, मुलांना मायेने धाकात ठेवणारी, सुसंकृत सहचारिणी लाभल्याने भाग्य अधिकच बहरले होते. मुले, सुना, नातवंडे यांच्या गोकुळात मी जरा हटकेच होतो.

गुरू माउलींकडून ध्वनित झालेला, सप्त सुरांतून प्रकटणारा ओंकार नाद ब्रम्ह आता खुणावत होता. सुखांच्या तृप्तीने आनंदून पाऊले गोकूळातून वैराग्याच्या प्रांतात जाऊ पाहात होती. 'नित्य नवी प्रभा' - येणारा प्रत्येक दिवसाचा सूर्य प्रकाशाच्या कणाकणाने सारे जग प्रकाशमान करणारा - गुरूमाऊलींच्या शब्दा-शब्दांचा अर्थ जाणून घेण्याची एक अनामिक ओढ आहे...'

एक दीर्घ श्वास घेऊन आजोबा पुढे म्हणाले, 'आता बहरण्याचा, मोहरण्याचा ओघ जरासा कमी झाला असला तरी बहरणे, मोहोरणे थांबलेले नाही! तुझ्या सावलीत थोडासा विसावलो आहे रे! तुझ्या रूपाने जणू जीवा-भावाचा मैतर अचानक सामोरा आला, तृप्ती अन् समाधानाची बरसात करून गेला!'

'बघ ना तू दरवर्षी बहरतोस, सा-यांना तृप्त करताना तूही तृप्त होतोस! सा-यांनी चाखलेल्या आंब्याच्या चवींनी तू समाधानाची गोडी चाखतोस! सगळ्यांना आनंद देवून परत बहरण्यासाठी तू मोकळा होतोस! मीही असाच वर्षा-वर्षांनी, प्रसंगानुरूप क होईना मोहरतच राहिलो आणि बहरणा-या वंशाला सावली देत तृप्त होत राहिलो...'

'आजोबा...' आंब्याने साद घातली... 'खरयं हे मोहोरणे अन् बहरणे आणि परत परत मोहोरणे हाच कदाचित आपल्या आयुष्याचा अर्थ असावा!'

असा हा मनस्वी संवाद गण्याच्या हाकेने भंगला! सूर्यदेव लांटांमागून निरोप घेत होते. गण्या बोलला, 'आजोबा, आपल्या मुलांची गाडी आली आहे!'.

गण्याचे वाक्य संपायच्या आतच... आजोबा शहारले! नातवंडांचा लडिवाळ वेढा त्यांच्या कमरेला पडला, आजोबा आज परत बहरले, आजोबांनी आंब्याकडे पाहिले, तोही जणू त्या प्रसंगाने सुखावला होता! आजोबांनाही जीवनाचा आनंद उमगला होता!

गण्याला निरोप देता देता त्यांनी आंब्याची निरोप घेतला!

आजोबा आज नव्याने सीमोल्लंघन करीत होते! आणि आंबा पुन्हा बहरत होता!

समाप्त!

यशवंत डबीर
१२-१२-१२

Monday, December 10, 2012

आंबा आणि आजोबा भाग - १

माझ्या बाबांनी लिहिलेली हि एक गोष्ट...

 आंबा आणि आजोबा भाग - १


विजया दशमीसाठी आजोबा कोकणातल्या गावी जाण्यास निघाले होते. कोकणची लाल माती त्यांना खुणावत होती. समुद्राच्या भरती-ओहोटींच्या लाटा आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत होत्या. नोकरी व्यवसायात पुर्णपणे झोकून दिल्यावर आठवणींचा एक कप्पा बंद झाला होता. आपण किती वर्षांपूर्वी को़कणातल्या गावी गेलो होतो ते आठवणे आजोबांना थोडेसे जड झाले होते!

मुलांनी ड्रायव्हर आणि गाडीची सोय केली होती. पण ऐकतील ते आजोबा कसले! एकटयाने प्रवास करायचा होता. नेहमीची लाल टपाची एस्.टी. बस आता 'परिवर्तन' झाली होती म्हणे! रातराणीचा २ बाय २ चा प्रवास अनुभवायचा होता. शिवाय जेष्ठ-नागरीकांचा सवलीताचा आनंद लुटायचा होता. मनासारखा चार-चौघांसारखा प्रवास करायचा होता. बरेच दिवसांनी एकटेपणाची मुशाफिरी करायची होती. 'अरे माझी काळजी करू नका' आजोबांनी मुलांची समजूत काढून त्यांना "बाय बाय" केला! बसमध्ये अगदी 'विंडो सीट' मिळाली होती. खिडकीवर मान टेकवून गार हवेचा आनंद आजोबा घेत होते!

बघता बघता बस शहराच्या बाहेरपडून गोवा महामर्गावर आली. पनवेल-पेण-मानगाव वरून बस धूराळा उडवीत कोकणातल्या लाल मातीच्या रस्त्याला लागली होती. अजूनही रस्ता तसा अरूंदच होता पण सडक आता पक्की झाली होती. रात्री कोकणातल्या गावांत तशीच निरव शांतता होती. दिव्याची सोय असल्याने गाव आल्याचे समजत होते. रस्त्यावर एकेरी वाहतूक वाहक-चालक ह्यांना परिचयाची होती. बघता बघता बस डोंगर माथ्यावर आली. घाट ओलांडला की दोन-अडिच तासांत आजोबांचे गाव येणार होते! थोड्याच वेळात कोकणातल्या वाड्या-वस्त्यांत शिरून बस मुक्कामाला पोहोचणार होती. एका अनामिक ओढीने आजोबा प्रवासाचा आनंद घेत होते.

गाडी सुसाटतच होती. वेगाची नशा जरा जास्तच वाटत होती. आजोबांना या नशेची देखिल भीति वाटू लागली. सहप्रवासी देखिल जागे झाले होते. नकळत सा-यांचे हात आपापल्या कुलदैवताला जोडले गेले होते!
ड्रायव्हर-कंडक्टर यांनी आपला अनुभव पणाला लावला होता. कंडक्टर प्रवाशांना धीर देत होता. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकलाच! एका वळणावर बस कशीतरी खड्डा आणि भिंत ह्यांत अडकून थांबली. 'गियर बॉक्स' जाम झाली! ड्रायव्हरने एका दमात सांगून टाकले! अपघाताची तीव्रता आणि प्रवाशांचे दडपण कमी केले. सारे प्रवासी स्वत:ला आणि इतरांना धीर देत बस मधून उतरले.

स्वतःच्या जीवापेक्षा काही प्रिय नसते ते अशा प्रसंगी  उमगते! झोळी खांद्याला लटकवून ओजाबा खाली उतरले! ड्रायव्हर-कंडक्टरचे आभार मानले!

सर्वत्र अंधार होता. आकाशात तारे आणि जमिनीवर दूरवरचे वाड्यां-वस्त्यांतील दिवे लुकलुकत होते. मोबाईलच्या प्रकाशात स्वत:ला आणि सहप्रवाशाला सारे न्याहाळत होते. जीव वाचला ह्या नादात किरकोळ खरचटणे सारेजण विसरले होते. मोबाईलवरून संपर्क साधण्याचे प्रयत्न चालू होते, रेंजा थोडा अडथळा होताच. ब-याच वेळाने दोन दिवे लुकलुकत येऊन थांबले. परिवर्तन बस बघून सा-यांना आनंद वाटला. ड्रायव्हर कंडक्टरची चर्चा सुरू झाली. तंबाखूचा बार भरला गेला. घाई-घाईने जमतील तेवढे प्रवासी आणि अपघाताची बातमी घेऊन परिवर्तन बस निघून गेली! आजोबा, सहप्रवासी ड्रायव्हर-कंडक्टरसह रस्त्याच्या कडेला शिळोप्याच्या गप्पा करत बसले! रातकिड्यांचे संगीत चालू होते. काजव्यांचा प्रकाश आजोबा खूप दिवसांनी परत अनुभवत होता. हाच प्रकाश सा-यांना आधार देत होता!

गप्पांच्या ओघांत नकळतच उमगले कि आता फटफटले होते! रातकिड्यांचे संगित भैरवीतून प्रसवू लागले. काजव्यांनी त्या ज्योतिर्मयाला मुजरा घातला आणि त्याचा निरोप मागितला! रस्ता आणि आजूबाजूचा परिसर थोडा स्पष्ट झाल्यावर आजोबांनी झोळी उचलली आणि सा-यांचे आभार मानले आणि गावाच्या दिशेने चालावयला सुरूवात केली. दिड-दोन किलोमीटर्सवर आजोबा एका वाडीवर पोचले, जाग दिसत होती. आजचा मॉर्निंग वॉक भन्नाटच होता! वाडीपाशी पोचल्यावर आजोबांनी खास कोकणी शैलीत साद घातली, तसाच प्रतिसाद आला आणि लगोलग एक माणूस देखिल आला! "बसा आजोबा - पाणी घ्या!" गण्याने पितळी तांब्या-भांडे आजोबांच्या हाती ठेवता ठेवता अलगद आजोबांच्या झोळिचा भार आपल्याकडे घेतला! खूप दिवसांनी गार गार पाण्याने आजोबांनी मुखप्रक्षालन केले! ते थंडगार पाणी पोटात साठवले. चेह-याला थंड पाण्याने स्वच्छ केले! हुशारी आली त्यांना!

इकडे कशी वाट धरली आजोबा? गण्याने विचारले, आजोबांनी एक दिर्घ श्वास घेतला आणि सारा प्रसंग गण्याला थोडक्यात सांगितला. आतून आलेला चहा गण्याने आजोबांना दिला, आणि म्हटले 'आजोबा... चहा घ्या नि मग गरम गरम पाण्याने स्नान करून घ्या! दुपारचे इथेच जेवून घ्या न् मग बघू पुढच्या प्रवासाचे!' गण्याचा आग्रह आजोबांना मोडवला नाही. मस्त गरमागरम पोह्यांचा नाष्टा करून आजोबांनी मुलांना संपर्क केला आणि गण्याकडे सुखरूप असल्याचे वर्तमान कळविले.
आजोबा ओसरीवर जरासे पहूडले. समोरच्या शाळेत मुले येऊ लागली. शाळा मास्तर आल्याची घंटा वाजली. प्रार्थना सुरू झाली आणि अलवार झालेले आजोबांचे मन आठवणींच्या माध्यमातून शाळेत जाऊन बसले. शाळेतील आठवणींचा पट उलगडत होता. आजोबा कविता म्हणू लागले -

चिमी-चिंगी शाळेत आली,
गोट्या-छोट्या अन् बंड्यादेखिल आली
उंदिरमामावर बसून गणपती आले
श्रीगणेशा अभ्यासाचा करून गेले
हातावर मोदक ठेवून गेले
मोरावर बसून सरस्वती आली,
ग, म, भ, न शिकवून गेली
बुध्दीची खिरापत वाटून गेली!
सिंहावर बसून दुर्गा आली
ज्युडो, कराटे शिकवून गेली!
हत्तीवर बसून लक्ष्मी आली
सोन्या-चांदिची महती वदली!
पेढे-बर्फी वाटून गेली!
बघता बघता शाळा सुटली...
चिंगी-चिमी घरा गेली!

शाळेच्या आठवणीत रमलेले आजोबा, बालपणच्या रम्यकाळाच्या झुल्यावर अनवटपणे झुलत होते! वर्गाची ती कौलारू खोली, पावसाळ्यात टप-टप गळणारे पाणी.. ते चुकवत शिकवणा-या मास्तरांची कसरत, चिखलाने भरलेले हात - पाय, डोक्यावरची पांढरी टोपी अन् घसरणारी चड्डी सांभाळत दंगा करण्याची ती अवीट गोडी.. या सा-या आठवणी त्यांच्या मनात रुंजी घालत होत्या!

क्रमशः
यशवंत डबीर

Sunday, September 18, 2011

आनंदयात्रा - मंतरलेले दिवस!

आनंदयात्रा - मंतरलेले दिवस!

वर्तमानपत्रामधे "आनंदयात्रा" बातमी वाचली आणि उमेश यांना फोन लावायची धावपळ उडाली. घरी सर्वांना विचारले कि राखी-पौर्णिमेला मी घराबाहेर गेलो तर चालेल का? आईसाहेब म्हणाल्या "बाबासाहेब आहेत म्हणल्यावर, हा घरात कसला थांबतोय? तो जाणारच आणि त्याला जाउ द्या!" परवानगी मिळताच मन प्रसन्न झाले! बाबासाहेबांची मुर्ति नजरेसमोर तरळू लागली! उमेशरावांना फोन लागला आणि नाव नोंदणीसाठी "पुरंदरे वाडा येथे यावे असे समजले.

बाबासाहेब तेथे भेटतील का? हा प्रश्नच चेह-यावर हास्य फुलवून गेला! या प्रश्नाच्या नादातच मी पुरंदरे वाडा गाठला. दार वाजवून आत प्रवेश केला तो साक्षात बाबासाहेब सामोरे बसलेले! मी काय प्रतिक्रीया द्यावी हे न समजून पुरता गोंधळून गेलो होतो! बाबासाहेब प्रसन्नपणे म्हणाले "या ... या.. बसा". माझ्या मनातल्या प्रश्नाचे असे सुरेख उत्तर मिळेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते! बाबासाहेबांना नमस्कार केला. थोडेफार बोललो, खरतर आश्चर्याचा इतका सुरेख धक्का बसला होता, मी माझे स्वप्नच जगत होतो!

उमेशरावांकडे पैसे भरले. कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे? आपण कुठे कुठे जाणार आहोत? कसे फिरणार आहोत? कुठे राहणार आहोत? हे असले प्रश्न मला पडलेच नाहित. बाबासाहेब आहेत आपल्यासमवेत.. मग काय कुठेही राहू, कुठेही जाऊ, पर्वा नाही! एक तास बाबासाहेबांच्या घरी कसा गेला ते उमगलेही नाही. मनात असे वाटत होते की इथेच राहावे, पण मग जराशी जाणीव झाली घरच्या जबाबदारींची, आवेग सावरला आणि बाबासाहेबांचा निरोप घेतला! बाबासाहेब म्हणाले, "आनंदयात्रेत भेटू!" माझी आनंदयात्रा तर आत्ताच सुरू झाली होती! १३ ऑगस्टची वाट पाहात पाहात आला दिवस आनंदाने पुढे जाऊ लागला! आणि १३ ऑगस्ट उगवलादेखील!

पहाटे ५:४५ ला मी सपत्नीक सिद्धि गार्डन जवळ पोहोचलो. थोड्याच वेळात बस आली. गणेशभाऊ, उमेशराव, अभिषेकराव यांच्यासमवेत गणपतीची आरती झाली आणि आमची बस भोरच्या दिशेने धावू लागली. वाटेत गार वा-याने झोप लागली. जाग आली ती थेट भोरच्या राजवाड्यासमोरच! सकाळचा नाश्ता करून आम्ही भोरचा राजवाडा पाहायला आलो. अवाढव्य राजवाडा आहे हा! राजा शिवछत्रपति, बालगंधर्व इ. यांचे शूटिंग येथेच झाले. आज या राजवाड्यात कोणीही राहात नाही. शूटिंगसाठी वगैरे हा वाडा उपलब्ध करून दिला जातो. राजवाडा पाहात असताना, एक विचार मनांत आला की त्या भकास आणि रिकाम्या खोल्यांमधून जर पूर्वीच्या काळात वापरांत असलेल्या वस्तूंची जर प्रतिकृति उभारली तर सर्वसामान्य माणूसही अगदी सहजपणे त्या काळात जाऊन येऊ शकेल. अमेरिकेमधे असे काही बंगले (खरतरं मॅन्शन्स) अजूनही तसेच्या तसे ठेवलेले आहेत! प्रत्येक खोलीचे प्रयोजन काय आहे, हे जर त्या खोलीजवळ नमूद केले तर राजवाड्याला भेट देणा-या प्रत्येकाला एक वेगळ्याच विश्वाचा अनुभव येईल. बाबासाहेबांनी सांगितलेल्या खाली लिहीलेल्या आठवणीचे महत्व या मुद्याला अधिक बळकटी देईल.

एकदा भोरच्या राजांनी एका मेजवानीचे आयोजन केले होते (१९५२ साल). या मेजवानीला बालगंधर्व उपस्थित होते, बाबासाहेब सुद्धा यावेळी तेथे उपस्थित होते. आज आम्ही ज्या सभामंडपामधे बसलो होतो त्याच्या बाजूने त्यावेळी पंगत लागली होती. पाठीला आणि बसायला पाट, समोर ताट ठेवायला पाट. सत्तर जणांची ती पंगत सजली होती. प्रत्येकाला चांदिचा ताट, वाटी, चमचे, फुलपात्र, तांब्या असे भव्य आयोजन होते त्या पंगतीचे! बाबासाहेब हि आठवण सांगताना जणू पुन्हा त्या पंगतीमधे जेवण करत होते आणि मलाही असे वाटले कि मी ती पंगत आत्ता पाहतोय! अनुभवतोय!

असा एखादा प्रसंग जर तेथे लिहून ठेवला तर खरंच किती मजा येईल! आज हा राजवाडा पाहायला येणा-या किती जणांना हे सगळे माहित असेल? नाव आहे "भोरचा ऐतिहासिक राजवाडा"... पण इथे "इतिहास" काय घडला हेच जर माहित नसेल तर त्याचे "ऐतिहासिकत्व" किती काळ टिकेल? पुढची पिढी कदाचित एक पुरातन वास्तू यापलिकडे या राजवाड्याला पाहणारदेखील नाही!

भोरच्या राजवाड्यात त्या देखण्या सभामंडपात बाबासाहेबांचे व्याख्यान झाले. सर्व आनंदयात्रींची ओळख झाली. "डबीर" आडनाव ऐकताच बाबासाहेबांनी माझ्या पत्नीला आमचे गोत्र विचारले. निकिताने गोत्र सांगितले आणि म्हणाली हिमांशु येऊन गेला होता, हे म्हणेपर्यंत बाबासाहेब म्हणाले "होय होय.. आले होते हे!" केवढा भाग्याचा क्षण होता तो! माझ्यासारखा सामान्य माणूस बाबासाहेबांच्या लक्षात होता! बाबासाहेबांनी "डबीर" घराण्याचा इतिहास सांगितला. कानांत प्राण आणून निकिता आणि मी तो ऐकत होतो. केवढी मोठी परंपरा, केवढा मोठा वारसा आपल्याला लाभला आहे, हे ऐकतानाच मनात एक संस्कार होत होता की हे सगळे आपण आणि आपणच सांभाळायचे आहे. नुसते आम्ही "सोनोपंत डबीर" यांचे वंशज असे चार-चौघांना सांगून नव्हे तर आपल्या आचरणातून ते तसे प्रतित झाले पाहिजे! बाबासाहेबांना नमस्कार करताना दरवेळी मी हेच मागणे मागत होतो कि "बाबासाहेब तुमचा आशीर्वाद असू द्या आणि हा वारसा समर्थपणे पेलण्याची आणि आचरण्याची ताकद आम्हांला असू द्या!" भोरच्या राजवाड्यामधे साक्षात "इतिहासपुरूषा"कडून मिळालेली हि ओळख आजही नजरे समोरून हटत नाही!

डबीरांचा इतिहास शोधताना मी १८३५ सालापर्यंत मागे पोहोचलो होतो, पण त्याच्याही मागे जाण्यात अडचणी येत होत्या. १८-एप्रिल-१६७८ (त्र्यंबकपंत डबीर यांची पुण्यतिथी) ते १८३५ (खंडेराव डबीर यांचे जन्मसाल) यांच्या मधील इतिहास सापडत नव्हता, पण बाबासाहेबांनी एका निमिषात सारी उत्तरे दिली! बाबासाहेब म्हणाले गोत्र हि अनेक कुलूपांची किल्ली आहे!

बाबासाहेब आम्हां सर्वांना भोर आणि परिसराची माहिती सांगू लागले, शिवरायांच्या अन् त्यांच्या सवंगड्यांच्या गोष्टी सांगू लागले! शिवरायांचे सरदार शिळीमकर यांची कहाणी तर फारच हृदयस्पर्शी आहे! बाबासाहेबांकडे विविध शस्त्रे आहेत, त्यांची माहितीही बाबासाहेबांनी आम्हांस करवून दिली. आनंदयात्रेमधे आमची पुढची वाटचाल कशी राहणार आहे याची माहितीही दिली. गणेशभाऊंसमवेत मग आम्ही भोरेश्वराचे मंदिर पाहिले. फार सुरेख मंदिर आहे हे! त्यानंतर बाबासाहेब पुण्याला एका पूर्वनियोजित कार्यक्रमाला निघाले आणि आम्ही वाईकडे वाटचाल करू लागलो. वाटेत भोर संस्थानाचा जुना राजवाडा पाहिला, मांढरदेवीचे आशीर्वाद घेतले आणि वाईत उतरलो.

गणेशभाऊ वाटेत दिसणा-या विविध ठिकाणांची माहिती आम्हाला देत होते, तो रोहिडा, तो पांडवगड! गणेशभाऊंचा अभ्यास थक्क करणारा आहे. साक्षात बाबासाहेबांची आठवण व्हावी अशी एक लकब आहे त्यांच्या बोलण्यात, एक आदब आहे वागण्यात! भविष्यात बाबासाहेबांनंतर जर कोणा इतिहासप्रेमी/संशोधकाचे नाव घ्यायचे झाल्यास ते नाव गणेशभाऊंचे असेल यात शंकाच नाही!

वाईमधे दुपारचे छानसे भोजन झाले. कृष्णेचे घाट, गणेश मंदिर (या मंदिराला मी लहानपणापासून "ढोल्या गणपती" मंदिर असे म्हणतो), काशी-विश्वेश्वराचे मंदिर असा सारा परिसर पाहिला आणि पसरणीच्या घाटाने महाबळेश्वराकडे सरकलो. गणेशभाऊ सांगत होते, "खान (अफजल) वाईतून पुढे गेला आणि रडतोंडीच्या घाटातून जावळीत उतरला! मला खरंच ती दहा हजारांची फौज पसरणीच्या उजव्या अंगाने दिसू लागली! त्या फौजेची रडतोंडीचा घाट चढता-उतरतानाची मौज पाहण्यात मी दंग होतो, त्या दहा हजार फौजेचा तो रडवेला तोंडवळा फार सुंदर दिसत होता! जणू सह्याद्रिचे एकूणएक दगड खानाच्या फौजेला म्हणत होते, "आमचा बाळ तुला कधीच गवसणार नाही, जिवंत वाचलास तरी असाच रडत खडत, तडफडत आणि ठेचाळत तू विजापूरला पळून जाशील!" त्या मंतरलेल्या अवस्थेत असतानाच आमची बस महाबळेश्वर मंदिरापाशी पोहोचली.

महाबळेश्वराचे दर्शन घेतले, तिथे बर्फाचा अभिषेक होता त्या दिवशी! याच मंदिर परिसरात कोठेतरी शिवरायांनी जिजाऊसाहेब आणि सोनोपंत डबीर यांची "सुवर्ण-तुला" केली होती. बाबासाहेबांच्या शब्दांचा आवश्यक तो परिणाम मनावर झाला होताच! आणि काय आश्चर्य मंदिरासमोरच एक भला मोठा मांडव दिसू लागला. खूप गर्दि जमली होती. प्रत्येकजण छान छान कपडे घालून आला होता! त्यांचा राजा आज आईची सुवर्ण-तुला करीत होता! केवढा मोठा प्रंसग होता आणि हे सारे जन त्या प्रसंगाचे साक्षीदार होते! मान वर करून थोडे पाहण्याचा प्रयत्न केला तर झेंडूच्या टपो-या फुलांनी सजवलेला एक भला मोठा तराजू दिसला, नेत्रांतून त्याचवेळी एक अश्रू ओघळला, आणि समोरचे ते दृश्य अंधूक अंधूक करून गेला! किती भव्य आणि दिव्य सोहळा असेल नाही तो! साक्षात शिवरायांची अन् जिजाऊसाहेबांची उपस्थिती! स्वराज्याच्या बालपणात सोनोपंतांनी केलेल्या स्वराज्य-सेवेचा केवढा मोठा ऋण-निर्देश आज त्यांचा राजा त्यांच्यासाठी करत होता! साक्षात राजाकडून आज सोनोपंतांची "सुवर्ण-तुला" होत होती! खरंच धन्य धन्य तो राजा आणि धन्य धन्य ते सोनोपंत! आजच्या जमान्यात केल्या कामाचा साधा धन्यवाद देतानाही मालकाची / मॅनेजरची जिव्हा अडखळते तिथे खुद्द राजा आज त्यांच्या एका सेवकाची "सुवर्ण-तुला" करीत होता! कोणत्याही मालकाकडून त्याच्या सेवकाचा असा ऋण-निर्देश, असा आदर-सत्कार ना या आधी झाला होता ना या पुढे कधी होईल! तो दिवस होता ६-जानेवारी-१६६५!

त्या सगळ्या प्रसंगात आणि बाबासाहेबांच्या शब्दांत असा काही गुंग झालो होतो कि अतिबळेश्वराचे, पंचगंगेचे आणि मारुतिरायाचे दर्शन घेण्याचे भानच राहिले नाहि! मन बाबासाहेबांच्या शब्दांतून आणि महाबळेश्वराच्या मंदिरातून बाहेर यायला कदापिही तयार होत नव्हते! सगळे आनंदयात्री परत येऊ लागले आणि गणेशभाऊंबरोबर परत बसकडे निघालो. बस आम्हाला आमच्या "वाडा" या मुक्कामाच्या गावी घेऊन आली. इथे महाबळेश्वर ते वाडा या प्रवासात आमच्या बसचालकाने कमाल केली या निर्देश करावाच लागेल नाहितर तो कृतघ्नपणा ठरेल. प्रचंड दाट धुक्यातून ज्या कौशल्याने त्यांनी गाडी चालवली त्याला खरच तोड नाही!

मुक्कामाच्या ठिकाणी प्रत्येक खोलीला एकेका गडाचे नाव दिलेले होते त्यानुसार आमची व्यवस्था "लोहगडावर" होती. आमच्या समवेत डॉ.राहूल क्षीरसागर, पवनराव आणि अविनाशराव हेही आनंदयात्री लोहगडावर उतरले होते. थोडे आवरून घेऊन आम्ही जेवणासाठी खाली आलो. गणेशभाऊंसमवेत दीर्घ काळ चर्चा झाली, अर्थातच चर्चेचा केंद्रबिंदू "शिवराय" होते! भरपावसात कितीवेळ चर्चा चालू होती याचे भानच नव्हते. भाऊंचा अभ्यास, त्यांची तळमळ आणि वास्तवात आलेले अनुभव हे सगळे भाऊ सांगत होते. भाऊंना म्हणालो, "मी तुमच्यासोबत सतत असेन, कधीही हाक मारा!" भाऊ फक्त हो म्हणाले. भाऊ इथे खरच सांगतो, मी जे बोललो ते खरेच आचरणात आणेन, इतरांचे मला माहित नाही, पण भाऊ तुमच्या हाकेला असेन तसा येईन, कधीही! तुमच्या या कार्यात मी खारीपेक्षा कमी वाटा जरी उचलू शकलो तरी भाऊ माझ्या जन्माचे सार्थक होईल!

गणेशभाऊंचे "किल्ले शिवनेरी" हे पुस्तक तिथे विकत घ्यायचे होते. प्रत्यक्ष बाबासाहेब यांनी या पुस्तकाची प्रस्तावना केली आहे! परंतू थोडे पैसे कमी पडल्याने, भाऊंचे पुस्तक भाऊंच्याच हस्ते स्विकारण्याचा योग साधता आला नाही याचे वाईट वाटले! पण हे पुस्तक मी नक्कीच विकत घेणार आहे!

रात्रीच्या भोजनाचा आस्वाद सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर घेतला. सगळेचजण भारावलेले आहेत, झपाटलेले आहेत. अभिषेकरावांनी "जाणता राजा" या महानाट्याच्या "धुळे" येथे झालेल्या गंमतीची आठवण सांगितली. ती गंमत त्यांच्याकडून ऐकण्यात जी मजा आहे, ती इथे लिहून आणि वाचून नाही येणार! अभिषेकराव हे "जाणता राजा" या महानाट्यात "शाहिरा"ची भूमिका करतात. रंगमंचावरचा त्यांचा विजेच्या वेगाने होणारा वावर त्यांच्या दैनंदिन आचरणातही दिसून येतो! जणू विजेचा लोळच! शाहिराची भूमिका करताना ते एक "मंडल" घेतात, तेव्हाचा त्यांचा वेग आणि अचूकता याला तोडच नाही!

असे सगळे हे एकसे एक मान्यवर आणि आज आम्हाला त्यांच्या पंगतीला जेवायला बसण्याचा मान मिळाला! सगळ्या कार्यकर्त्यांमधे कुठेही बडेजाव नाही, मोठेपणाचा आव नाही! खरंच बाबासाहेबांचे हे कार्यकर्ते म्हणजे बाबासाहेबांचे "चालते-बोलते" संस्कारच आहेत! आदब-मान-मर्यादा सा-या सा-या गोष्टी यांच्याकडून सातत्याने शिकून घ्याव्यात!

दुसरा दिवस पहाटे चार वाजताच उगवला. अविनाशरावांनी आधी आंघोळ वगैरे आटोपले आणि मग मी नंबर लावला! त्या थंड वातावरणात गारगार पाण्याने स्नान करण्याची मौज काही औरच होती! सलग दोन दिवस ती मौज अविनाशराव आणि मी लुटली!

आज प्रतापगडावर जायचे होते. सकाळी सकाळी गरमागरम बटाटेवड्यांचा नाश्ता अगदी भरपेट केला आणि आमची बस प्रतापगडाकडे दौडू लागली. वाटेत खूप सारे जण एका ठिकाणी उतरले, ते पायी चढून येणार होते. मी मात्र बसनेच जाण्याचा निर्णय घेतला, नुकतीच गुडघ्याला दुखापत झालेली आणि त्यामुळे मला रिस्क घ्यायची नव्हती म्हणून मग हा अप्रिय निर्णय घ्यावा लागला! बस वर पोहोचली आणि मग खानोलकर, मेहेंदळे कुटुंबियांसमवेत गप्पा झाल्या. सगळेच जण खूप उमद्या स्वभावाचे आहेत. थोड्याच वेळात पायदळ गडापर्यंत पोहोचले आणि त्यांच्यासमवेत आम्ही गडावर दाखल झालो. गणेशभाऊंचे पाठांतर, विषय खुलवून सांगण्याची हातोटी, आणि सगळ्यांना त्यात सहभागी करून घ्यायची कला खरोखर वाखाणण्याजोगी आहे! प्रतापगडाची त्यांनी करून दिलेली ओळख खूप छान वाटली. प्रतापगडाच्या चोरवाटा, बांधकाम कौशल्ये इत्यादी गोष्टी माहीत होत्याच पण त्याच पुन्हा गणेशभाऊंकडून ऐकताना एक प्रकारचे समाधान मिळत होते! ऐन धुक्यात प्रतापगडाचे सौंदर्य आम्ही न्याहाळत होतो. बालेकिल्ला, शिवरायांचा पुतळा, घोरपडीचे शिल्प, शिवरायांची सदर, केदारनाथ असा सगळा परिसर पाहिला, ऐकला आणि अनुभवलासुद्धा! खंडोजी खोपडे याला दिलेल्या शिक्षेची अमंलबजावणी होत असताना जाणवला तो शिवशाहीचा शिरस्ता, "गद्दारीला माफी नाहीच!" आणि वैषम्य वाटले आजच्या फोफावल्या भ्रष्टाचाराचे!

भवानी मातेच्या मंदिरामधे आलो. देवीचे दर्शन घेतले. स्फटिकाचे शिवलिंग, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार यांचेही दर्शन घेतले. आरती झाली आणि आम्ही गड उतरू लागलो. खाली येताना वाटेत थोडा वेळ खरेदी करण्यात गेला आणि आम्ही दुपारच्या भोजनाला पुन्हा आमच्या मुक्कामी परतलो.

रात्री पार या गावीच्या रामवरदायिनी देवीच्या मंदिरात दर्शनाला जायचे होते. बाबासाहेबांचे व्याख्यान, देवीचा गोंधळ असे कार्यक्रम तेथे होणार होते. देवीच्या देवळातच संध्याकाळचा नाश्ता झाला. देवीचे दर्शन, तिचा तो लाकडी सभामंडप खरोखर अवर्णनीय आहे. एक छोटीशी प्रश्न-मंजूषा तेथे आयोजित करण्यात आली होती. बाबासहेबांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारतानाचा आनंद हा पुणे विद्यापीठात एम्.सी.एम. या पदव्युत्तर पदवी परिक्षेत ऑरेकल या विषयात मिळविलेल्या प्रथम क्रमांकापेक्षा जास्त होता! माझे नाव घेताच पडलेली पहिली टाळी निकिताची होती!

रामवरदायिनी मंदिराचा इतिहास, त्या मंदिराचे बाबासाहेबांनी पाहिलेले आणि आज बुजवलेले तळघर, त्या तळघरात छत्रपति राजाराम महाराजसाहेबांनी औरंगजेबाच्या आक्रमण काळात लपविलेली प्रतापगडावरील भवानी मातेची मुर्ती! ती मुर्ती प्रतापगडावरून हलविताना राजाराम महाराजसाहेबांनी बोललेला नवस, हे सारे बाबासाहेबांकडून ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले होते! सारे प्रसंग एखाद्या चित्रपटासारखे नजरेसमोर दिसू लागले! परत वाटले कि हे सारे प्रसंग या मंदिरात कुठे लिहून ठेवले तर इतिहास जपला नाही का जाणार? एक मानस आहे कि हे सगळे मीच लिहीन आणि बाबासाहेब यांच्या नजरेखालून घालून ते या देवळात बसवता येतील का हे पाहीन? कोणी तरी करावे म्हणून विचार कर राहण्यापेक्षा आपणच ते केले तर जास्त चांगले नाही का?

आनंदयात्रींचे इथे एक छोटेखानी विविध गुणदर्शन झाले. श्री. अनंतराव कंटक आणि श्री. शंतनूराव पाटील यांनी बहारदार पोवाडे गायले, सौ. मंजिरीताई कंटक यांनी सुरेल गायन सादर केले. मग देवीचा गोंधळ झाला. मी बाबासाहेबांना म्हणालो, "बाबासाहेब आमच्या लग्नानंतर हा पहिलाच गोंधळ", मनापासून हसले बाबासाहेब! मी आणि निकिताने फुगडी घातली या कार्यक्रमात. रिंगण करून आम्ही सगळ्यांनी फेर धरला, मनमुराद नाचत होतो, आणि स्वप्न म्हणू कि भाग्य? भाग्यच असावे, खुद्द बाबासाहेब आमच्यासमवेत फेर धरून नाचत होते! वयाच्या नव्वदीतला त्यांचा तो जोष आमच्यात एक टक्का जरी आला तरी शिव-चरित्र अवघ्या जगात पोचेल, नाही का?

गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आम्ही मुक्कामी परतलो. बाबासाहेब आमच्याच समवेत आमच्या मुक्कामावर आले होते! भोजनाचा आस्वाद घेतला आणि हळूच निद्रादेवीच्या कुशीत शिरलो.

तिस-या दिवशी आमचा मुक्काम हलला आणि परतीचा प्रवास सुरु झाला. नरवीर तानाजी मालूसरे यांच्या उमरठ या गावी जाऊन त्यांच्या आणि शेलारमामा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. गणेशभाऊंची प्रतिभा इथे सुरेख फुलून आली. भाऊंनी शिवराय आणि त्यांचे सहकारी यांचे वर्णन करताना एक अतिशय समर्पक वाक्य उच्चारले, "हौसेने संसार होतात. त्यागाने राष्ट्र उभे राहते, पण त्यागाचीच हौस निर्माण झाल्यावर इतिहास घडतात!"

तानाजी मालूसरे यांच्या समाधी दर्शना नंतर आम्ही जवळच असलेल्या एका धबधब्याला भेट दिली तिथला झुलता पूल पाहिला. बाबासाहेबही आमच्यासमवेत होते. मग आम्ही पोलादपूरला आलो. कविंद्र परमानंद यांची समाधी पाहिली, तिथे उभारलेली दुर्ग सृष्टी पाहिली. तिथे गणेशभाऊंनी आम्हाला निरनिराळ्या किल्ल्यांचा संक्षिप्त इतिहास सांगितला.

दुपारचे भोजन झाले. बाबासाहेबांनी निरोपाचे शब्द सांगितले. भावी काळात घोडेस्वारी, तंबूतील मुक्काम, रॉक-क्लायंबिंग अशी आनंदयात्रा काढायचा मनोदय व्यक्त केला. आनंदयात्रींनीदेखिल आपली मनोगते व्यक्त केली. खुद्द बाबासाहेबांच्या शेजारी स्टेजवर उभे राहून बोलणे म्हणजे काय आणि कसे वाटते याचा अनुभव मीही घेतला. सारे अंग रोमांचित झाले होते, असाच काहीसा अनुभव मी माझ्या "बाल शिक्षण मंदिर" या भांडारकर रस्त्यावरील शाळेतील माझ्याच बालपणीच्या शिक्षकांना संगणक शिकवताना घेतला होता!

बाबासाहेबांनी तिथे गणेशभाऊंचे हात बनून त्यांच्या भाषणावर हातवारे करुन कार्यक्रमात रंग भरला. अफाट गर्दिमुळे शिवथरघळीचा कार्यक्रम रद्द करावा लागला. थोडावेळ वरंध घाटात थांबलो, रात्रीचे जेवण वरंध येथील शाळेत घेतले आणि पुण्यात परतलो.

खरतर फक्त शरीरानेच पुण्यात आलो होतो, अजूनही मी त्याच परिसरात रमलो आहे. बाबासाहेबांचे शब्द ऐकतो आहे, संस्कारीत होतो आहे. गणेशभाऊंबरोबर चर्चा करत आहे, त्यांच्याकडून नविन नविन गोष्टी समजून घेत आहे, शिकत आहे!

आनंदयात्रा १५ ऑगस्टला संपन्न झाली असली तरी माझ्यातला मला सापडलेला आनंदयात्री अजूनही सह्याद्रितच बागडतोय, बाबासाहेबांचे बोट धरून!

हिमांशु यशवंत डबीर

ता. क. आज १८ सप्टेंबर २०११ रोजी साक्षात बाबासाहेब यांचे समोर "पुरंदरे वाडा" येथे या प्रवासवर्णनाचे वाचन केले. बाबासाहेब म्हणाले, "आनंदयात्रा परत घडली, छान लिहीले आहे!" गणेशभाऊही यावेळी उपस्थित होते, त्यांनाही लिखाण आवडले, त्यांनी या लिखाणाची प्रत त्यांचे जवळ ठेवून घेतली. खूप खूप आनंद झाला! भाऊंकडून त्यांचे " शिवरायांचा पाळणा - किल्ले शिवनेरी" हे पुस्तक त्यांच्या स्वाक्षरीसह प्राप्त झाले. धन्य झालो!

Friday, July 15, 2011

समजून घे गं आई

समजून घे गं आई
समजून घे गं आई असे
करोडोंची माता तु, वांझोटीच राहिली!
बरे झाले इतिहास आज
पुन्हा अबोलच राहिला!
समजून घे गं आई असे
करोडोंची माता तु, वांझोटीच राहिली!


व्यर्थ जगला "शिवा" अन्
मूर्ख म्हणून मेला "संभा"
आठवणीतला तो "राणा"
प्रताप त्याचाही शरमला!
समजून घे गं आई असे
करोडोंची माता तु, वांझोटीच राहिली!


वेडीच होती ती "जिजा"
जिने स्वराज्य माळ जपली!
कमअक्कल होती "लक्ष्मी"
रणात उगा पडली खर्ची!
समजून घे गं आई असे
शेकडोंची माता तु, तरी वांझोटीच राहिली!


व्यर्थ ठरली बलिदाने
त्या "स्वातंत्र्यवीरांची"
कुठला भगत, कोण राजगुरू
पुसली गेली स्मृति त्यांची
समजून घे गं आई असे
करोडोंची माता तु, वांझोटीच राहिली!


येईल परत उत आता,
शिळ्याच त्या कढीला
आरोपांच्या झडतील फै-या,
फिकिर ना कुणास तुझी,
समजून घे गं आई असे
करोडोंची माता तु, वांझोटीच राहिली!


नको आई नको रडू
पदर नको डोळा लावू
न सांगताही तूच आता,
समजून घे गं आई असे
करोडोंची माता तु, वांझोटीच राहिली!

हिमांशु डबीर
१३-जुलै-२०११